लढाई

बरोबर १२५ वर्षांपूर्वी एक घटना घडली ज्यामुळे साऱ्या जगाची गणितं बदलली; अन्यायाविरुद्ध लढण्याचं एक नवीन हत्यार (खरं तर हत्यार म्हणणं हेही त्या साधनाचा अपमान आहे) मिळालं; आणि वर्णद्वेषाच्या विरुद्ध एक नवीन चळवळ उभी राहिली जीची प्रेरणा मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर, नेल्सन मंडेला इत्यादी वर्णद्वेषाविरुद्ध लढा देणाऱ्यांनी घेतली आणि हे लढे यशस्वी केले. दक्षिण आफ्रिकेत सुरू झालेली ही वर्णद्वेषाची चळवळ भारतात येऊन सत्याग्रहरूपी स्वातंत्र्य यज्ञात रूपांतरित झाली हा इतिहास आहे.

७ जून 1893 रोजी, एक तरुण वकील दक्षिण आफ्रिकेत रेल्वेचा प्रवास करत होता. त्याने फर्स्ट क्लास चे तिकीट काढले होते परंतु या प्रवास दरम्यान त्याला सर्वात मागच्या व्हॅन मध्ये शिफ्ट होण्यास सांगितले कारण तो तरुण युरोपिअन वंशाचा नव्हता. सत्यप्रिय अशा या माणसाने या अन्यायाला विरोध केला आणि फर्स्ट क्लासचे तिकीट असल्याने तो याच डब्यातून प्रवास करेल असे ठणकावून सांगितले. शेवटी भर हिवाळ्यात रात्रीच्या वेळी त्या तरुणाला एका निर्जन स्टेशन वर उतरवण्यात आले. ती रात्र त्या तरुणाने स्टेशनवर कुडकुडत काढली परंतु दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय झाला तो एका निर्धाराने – वर्णद्वेषाविरुद्ध लढा देण्याच्या; आणि तो लढा सत्याचा होता, सत्याच्या आग्रहाचा होता. यामध्ये दंडुकेशहीचा विरोध शांत मनाच्या निग्रहाने करायचा होता. प्रसंगी शारीरिक प्रहार झेलून मानसिक प्रहार करायचे होते. भौतिकाची लढाई आत्मिकाने जिंकायची ही एक अजब पद्धत होती. आणि याचा शोध आणि प्रसार करणाऱ्या या तरुणाचे नाव होते मोहनदास करमचंद गांधी – महात्मा गांधी.

आपणही रोज अनेक भौतिक लढाया लढत असतो जसे व्यायाम करण्यासाठी उठणे असो वा प्रसंग पडल्यास एखादा किलोमीटर चालावयास लागणे असो वा भर उन्हाळ्यात वीज नसल्यामुळे पंखा किंवा AC चालू नसणे असो. या प्रत्येक लढाईत आपल्या शरीराला त्रास होणार आहे कारण आपल्या शरीरावर होणारा हा नैसर्गिक प्रहार आहे. आणि हा प्रहार शरीरावर होत असताना शरीर त्याला स्वतःला योग्य असा प्रतिसाद देईल जसे – झोप रे काय उगाच त्रास सकाळी सकाळी; वा चल रिक्षा कर किंवा गाडीने जा त्याला काय; वा उकाड्यामुळे अफाट चिडचिड. पण जर या भौतिक लढायाही आपण आत्मिक पातळीवर लढलो तर? म्हणजे सदसद्विवेकबुद्धीला अनुसरून मनाचा निग्रह करून या भौतिक लढायांवर विजय मिळवला तर? विचार करून बघायला काय हरकत आहे.

खरंतर निम्मी लढाई आपण मनात जिंकत किंवा हरत असतो. तेंव्हा यापुढे कोणतीही भौतिक असो वा आत्मिक लढाई, आपण आधी ती मनात जिंकूया आणि मग ती पूर्ण जिंकण्यासाठी प्रत्यक्षात पूर्ण प्रयत्नाने लढूया.

©मनीष पटवर्धन
६ जून २०१८

Advertisements

रत्नत्रय

जगातील बाकीच्या म्हणतं संस्कृती अजुनी जन्माला यायच्या होत्या किंवा अजुनी त्या रानटी अवस्थेत जगात होत्या. जगातील महान ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो अजुनी जन्माला यायचा होता. त्यावेळी म्हणजे सुमारे २७०० वर्षांपूर्वी भारतीय संस्कृतीत एक महान तत्त्ववेत्ता जन्माला आला. त्यांनी संपूर्ण भारताला एक नव्या विचाराची ओळख करून दिली ज्यामुळे भारतीय संस्कृतीची खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक संस्कृतीकडे वाटचाल सुरू झाली. हा विचार म्हणजे अहिंसेचा आणि ती महान व्यक्ती म्हणजे भगवान महावीर. आज त्यांची जयंती तिथी.

रत्नत्रय हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात आचार्य उमास्वामी यांनी दिलेला महानतम विचार आहे. सम्यक दर्शन म्हणजे योग्य तत्वांवर, योग्य विचारांवर विश्वास, आपल्या भोवतालच्या गोष्टींविषयी योग्य आकलन. जर आपला विश्वास दृढ असेल, त्याचे योग्य आकलन असेल तर आपण त्यातुन मिळणाऱ्या ज्ञानासाठी प्रयत्न करतो. ते ज्ञान मिळेपर्यंत मनाला स्वस्थता मिळत नाही. हे मिळालेले ज्ञान योग्य असले पाहिजे म्हणजेच सम्यक ज्ञान. आपल्याला मिळालेले ज्ञान हे योग्य आहे का हे तपासून घेतलेले असले पाहिजे. आणि त्याची तपासणी तेंव्हाच होईल जेंव्हा ते ज्ञान आपण वापरात आणू. वापरात न येणारे ज्ञान हे तापसलेले नसणार त्यामुळे त्याला सम्यक ज्ञान म्हणणे चुकीचे होईल. तिसरं रत्न म्हणजे सम्यक चरित्र. जर आपलं ज्ञान सम्यक असेल तर आपले विचार सम्यक असतील. जर आपले विचार सम्यक असतील, आपली श्रद्धा सम्यक असेल तर आपले आचार ही सम्यकच असतील. आणि आचारावरून माणसाचे चारित्र्य बनते. म्हणूनच आचार्य उमास्वामी म्हणतात जर आपल्याकडे सम्यक दर्शन (right faith), सम्यक ज्ञान (right knowledge) आणि सम्यक चरित्र (right conduct) ही तीन रत्ने ज्याच्याकडे असतील तो मुक्तीच्या मार्गावर पुढे जाईल.

हा जैन तत्त्वज्ञानाचा महासागर इतका अथांग आहे की यात एकदा पडलो की बाहेर यावेसेच वाटणार नाही. एक विचार दुसऱ्या विचाराला ट्रिगर देत राहील आणि या विचारांच्या लाटा आपलं चिंतन आनंदमयी करून जातील यात शंकाच नाही.

– मनीष पटवर्धन

२९ मार्च २०१८

गुंतागुंत

स्वत्वचे दुसऱ्याला दिसणारे/जाणवणारे रूप म्हणजेच अहं आहे. जगात कोणीच अहं बघू शकलेला नाही. तो नेहमी दुसऱ्याला दिसलेला आहे आणि त्याने तो दाखवून दिलेला आहे. जिथे एकाच माणूस असेल तिथे अहं नसतोच तिथे फक्त स्वत्व. अहं तेंव्हाच येतो जेंव्हा तिथे दुसरा माणूस किंवा इतर माणसे येतात आणि तुमचे स्वत्व ते अहं म्हणून बघायला लागतात. आपल्याला ते जरी स्वत्व वाटत असेल तरी तो अहं च असतो. आणि प्रत्येकाच्या घेण्याच्या capacity वर त्याची magnitude ठरते. आता यात असेही अध्यारुत आहे कि अहं हा दाखवायची गोष्ट नसून दिसणारी गोष्ट आहे. म्हणजे कोण कसे बघेल त्यावर. म्हणूनच आपला अहं समोरच्याच्या दृष्टीने किती मोठा आहे कि लहान हे आपल्यालाही कळत नसते. आणि ठिणग्या पडायला लागतात.

माणसाने अहं धरावा की सोडावा हे खरंच त्याच्या हातात आहे का? कारण ज्याला आपण अहं म्हणतो तोही आपला नसतो. तो अवलंबून असतो दुसऱ्यावर. मग अहं सोडणे म्हणजे नक्की काय? किंवा तो सोडल्याने काय होईल?

आताच म्हटल्याप्रमाणे जर अहं ही दुसऱ्याला दिसणारी गोष्ट आहे तर दुसऱ्याला जेंव्हा माझ्या स्वत्वाचा आकार शून्यवत दिसेल तेंव्हाच त्याला माझा अहं शून्य झालेला दिसेल. पण माझ्या स्वत्वाचा आकार शून्य झालेला तेंव्हाच दिसेल जेंव्हा माझ्या स्वत्वाचा प्रभाव त्याच्या/तिच्या स्वत्वाच्या प्रभावक्षेत्रात गुंतागुंत निर्माण करत नसेल. म्हणजे माझा अहं मी मारणे म्हणजे माझ्या प्रभावक्षेत्रात असलेल्या व्यक्तींच्या स्वत्वाचा प्रभावक्षेत्रात गुंतागुंत न करणे. बरेचसे संत अथवा संन्यासी या मार्गाने गेलेले आपल्याला दिसतात. पण काही कर्मयोगी एक पाउल पुढे जाऊन, आपले आणि दुसऱ्याच्या स्वत्वाचे प्रभावक्षेत्र पूरक किंवा align करायचा प्रयत्न करतात आणि दोघांचीही उन्नती साधण्याचा प्रयत्न करतात.

खरंच आपल्यालाही आपलं प्रभावक्षेत्र ओळखता येईल का? त्याहीपेक्षा ते दुसऱ्याच्या प्रभावक्षेत्रात गुंतागुंत तर करत नाहीये ना हे ओळखता येईल का? आणि करत असेल तर त्यातून बाहेर पडत येईल का? आणि त्याहूनही पुढे जाऊन आपले प्रभावक्षेत्र दुसऱ्याच्या प्रभावक्षेत्राशी align करता येईल का? आणि हे जर एखादा/एखादी करू शकला/शकली तर आयुष्याचे सोने होईल यात शंकाच नाही.

मनीष

७ मार्च २०१८

ज्ञानयज्ञ

२००४ ची किंवा २००३ ची दुपारची १:३० ची वेळ असेल. जिओमेट्रिक सॉफ्टवेअर सोल्युशन्स च्या रेड फोर्टच्या बाहेर सायकलवर पेरूची टोपली घेऊन आलेल्या पेरुवाल्याकडून पेरू घेऊन गप्पा मारत त्या चांदण्यातून (?) एक रपेट मारणारी ३-४ टाळकी. “ह्या !! कल्याणला याच्याहून मोठे पेरू मिळतात” अशा एका कल्याणकरी कंमेण्ट पासून सेरेना/व्हीनस या बायका आहेत की पुरुष या पर्यंतच्या काहीही चर्चा. आता एवढे सगळे आय आय टीअन्स एकत्र असल्यावर पुराव्याशिवाय चर्चाच होणार नाही. मी एखादा विकिपीडिया वरच्या लेखाचा पुरावा देतोय. पण निखिल सोमण ऐकायलाच तयार नाही. म्हणे बोगस आहे – विकिपीडिया. कोणी मनाला येईल ते लिहिते आणि आपण का खरे मानायचे? त्याचं बरोबर असतं. आणि माझी सपशेल माघार.

आजच्याच दिवशी २००६ साली, इंग्रजी विकिपीडियाचे १ मिलियनावे (१० लाखावे) पान लिहिले गेले होते. विकिपीडिया ही फक्त लोकांनी काहीही लिहलेल्या गोष्टींवर अवलंबून नव्हती. त्यातील माहितीला कोणीही आक्षेप घेऊ शकत होते आणि ती माहिती विश्वासार्हता येई पर्यंत संदिग्ध म्हणून मार्क केली जात होती. अशा तऱ्हेने हा माहितीचा यज्ञ अव्याहत सुरू आहे आणि याची खासियत म्हणजे कोणीही कोणत्याही विषयावर पान तयार करू शकतो आणि त्याला असलेली माहिती त्यात भरून ठेऊ शकतो. एकदा ही माहिती प्रकाशित झाली की जगभरातून कोणीही ही माहिती पाहू शकतो आणि वापरू शकतो. १९९५ साली कनिंगहॅम यांनी तयार केलेल्या विकी या वेब इंजिन (फ्रेमवर्क) वर जिमी वेल्स आणि लॅरी सॅन्गर यांनी २००१ मध्ये विकिपीडियाची सुरुवात केली. यातील विकी हा एक हवाईयन शब्द आहे आणि याचा अर्थ आहे “चटकन”. विकिपीडिया प्रमाणेच विक्शनरी हाही एक ग्लोबल डिक्शनरी चा उपक्रम आहे. यात जगातील कोणत्याही भाषेतील शब्द सापडू शकेल, परंतु विकिपीडियाच्या तुलनेत हा उपक्रम खूपच मागे आहे.

आज विकिपीडियावर (इंग्रजी) ५६ लाख पाने आहेत आणि रोज वाढतच आहेत. परंतु एक खेदाची गोष्ट म्हणजे या ज्ञानयज्ञात आपण मराठी भाषिक खूपच पिछाडीवर आहोत. आज विकिपीडियावर (मराठी) फक्त ५०००० एक पाने आहेत आणि यातील बरीचशी अर्धीमुर्धी आणि आशयविरल आहेत. विक्शनरी मध्ये तर खूप कमी मराठी शब्द पर्याय आहेत. आपण आपली मराठी टिकवायची आणि जोपासण्याची भाषा करत असू तर ती ज्ञान भाषा कशी होईल याचा विचार करायला हवा आणि विकिपीडिया, विक्शनरी सारख्या माध्यमांचा वापर (जी अतिशय सोपी आहेत) करून त्यावर कृतीही करायला हवी आहे.

मनीष

१ मार्च २०१८

रंग माझा वेगळा

लहानपणी दोन रुपयांचे प्लास्टिकचे भिंग (हे काचेचंही असतं हे त्या काळात माहीतही नव्हती) आणून उन्हात कागद जाळण्यापासून आमची प्रकाशाच्या स्वकृत प्रयोगांची सुरूवात झाली. त्याआधी साबणाच्या पाण्यातील रंगबिरंगी बुडबुडयांनी प्रकाशाच्या गंमतशीर वागण्याशी डोळेओळख करून दिलेलीच होती. त्या खेरीज मणेरच्या दुकानात (त्याकाळी कुरुंदवाड मधील कलाकुसरीचे समान मिळणारे एकमेव दुकान) असलेल्या प्लास्टिकच्या हिऱ्यामधून (?) येणारा सप्तरंगी प्रकाश ही पण एक भन्नाट गोष्ट होती. नंतर पाठ्यपुस्तकातून न्यूटन भेटला व प्रकाश अजूनही दैदिप्यमान झाला.

या प्रकाशाशी नातं असलेला माझ्या मातीतील संशोधक म्हणजे सर सी. वी. रामन. आजच्याच त्यांनी दिवशी जगाला रामन इफेक्ट ची ओळख करून दिली. अस्वच्छ किंवा धुलिकामय माध्यमातून जाताना प्रकाश विखुरला जातो त्याला रेलाय इफेक्ट कारणीभूत असतो. परंतु स्वच्छ माध्यमातून सुद्धा प्रकाश विखुरला जातो त्याला रामन इफेक्ट कारणीभूत असतो. त्या माध्यमातील रेणू हा प्रकाश विखुरत असतात आणि त्या प्रकाशाची तरंगलांबी ही त्या माध्यमातील रेणूंची कॅरॅक्टरशिप असते. याचा उपयोग एखाद्या मिश्र पदार्थात असलेल्या अनेक पदार्थ शोधण्यासाठी होतो.

सातवी आठवीच्या वर्षात आम्ही काही वर्गमित्रांनी सर सी. वी. रामन विज्ञान मंचाची स्थापना केली होती. त्याद्वारे आम्ही एक विज्ञान स्पर्धाही भरवली होती. त्यामध्ये पन्नास ऑब्जेक्टिव्ह प्रश्न होते. प्रश्न काढण्यापासून ते सायक्लोस्टाईल चे मशीन भाड्याने घेऊन प्रश्नपत्रिका छापण्यापर्यंत सर्व गोपनियतेसहित आम्ही लहान मुलांनी केले होते. परीक्षेला रु. २ किंवा ५ (नक्की आठवत नाही) प्रवेश फी सुद्धा होती आणि खर्च वजा जाऊन उरलेल्या पैशात बक्षिसाची सोयही केली होती. ना नफा ना तोटा या तत्वावर यशस्वी केलेला (झालेला) आमच्या आयुष्यातील हाही एक प्रयोग होता. पण इव्हेंट आयोजन आणि व्यवस्थापनाचे हे धडे आम्ही लहानपणीच मिळवले यात आमच्या पालकांचा (आम्हाला हवं ते न लुडबुडता करू दिल्याबद्दल) आणि शिक्षकांचा (आमच्यातील आत्मविश्वास नेहमी वाढवत नेल्याबद्दल) निश्चितच सिंहाचा वाटा आहे.

प्रकाशाचे अनेक रंग एकत्र येऊन ज्याप्रमाणे प्रवास करतात त्याप्रमाणे विविध क्षेत्रात प्राविण्य वा कसब असलेल्या व्यक्तीही एकत्र येऊन एखादी यशस्वी गोष्ट करून दाखवतात, एखादे सामाजिक कार्य यशस्वीरित्या पूर्ण करतात. आपणही आपला रंग ओळखून या प्रकाशवाटेवर इतर रंगांच्या प्रकाशात मिसळून चालायला काय हरकत आहे? कदाचित एखादं चांगलं सामाजिक कार्य आपल्या रंगाच्या प्रकाशाची वाट बघत पूर्णत्वासाठी थांबलंही असेल.

मनीष

२८ फेब्रुवारी २०१८

किमयागार

योजना, रचना, अभिकल्प या कोणत्याही उत्पादनासाठी किंवा प्रॉडक्टसाठी एवढ्या महत्वाच्या आहेत की प्रॉडक्ट जन्मायच्या आधीच तो प्रॉडक्ट कसा दिसेल पासून तो कसा काम करेल याचा विचार झालेला असतो. प्रॉडक्ट हा त्याच्या जनकाच्या किंवा जनक टीमच्या मनात पूर्वीच तयार झालेला असतो. एवढंच नाही तर तो प्रॉडक्ट कस्टमर पर्यंत पोचून त्याचा वापरही सुरू झालेला असतो. कस्टमरला त्या प्रोड्युक्टमधून काय हवं आहे, त्या प्रोड्युक्टमधून त्याला काय मूल्यवृद्धी होणार आहे आणि या मूल्यवृद्धीसाठी तो किती किंमत मोजायला तयार होईल या सर्व गोष्टींचा विचार प्रॉडक्ट जन्माला येण्यापूर्वीच झालेला असतो. आणि असे असेल तरच तो प्रोडक्ट यशस्वी होण्याची शक्यता वाढलेली असते.

आज डिजाईन मध्ये क्रांती केलेल्या एका यशस्वी उद्योजकाचा जन्मदिन. प्रॉडक्ट हे बाहेरून तर सुंदर दिसलेच पाहिजे पण ते आतूनही तितकेच सुंदर असले पाहिजे. इतकेच नव्हे तर तर त्या प्रोडुकटने ज्या पद्धतीने काम करणे अपेक्षित आहे तेही सुंदर पद्धतीने केले पाहिजे. आणि त्याचे हे बाहेरून, आतून सुंदर दिसणे तसेच त्याने काम करायची पद्धत सुंदर असणे हे प्रॉडक्ट डिजाईनचाच भाग आहे. असे प्रॉडक्ट डिझाईनच्या बाबतीत त्याचे विचार होते. या गेम चेंजर उद्योजकांचे चे नाव आहे स्टीव्ह जॉब्ज. आज हा माणूस आपल्यात नाही पण त्याने दिलेली ऍपलची उत्कृष्ट प्रॉडक्ट्स आजही त्यांच्या क्षेत्रात नंबर वन म्हणून ओळखली जातात.

सुबकता ही प्रॉडक्टची पहिली ओळख असते. त्याचं दिलखेचक दिसणं कस्टमरला त्यांच्यापर्यंत घेऊन येतं. त्यामुळे ती डिझाईनचा भाग असणं खूपच महत्वाचं आहे. प्रॉडक्ट डिजाईन करताना कस्टमर बरोबर असलेली सहसंवेदनाही खूप महत्त्वाची आहे. सहसंवेदना म्हणजे त्याला नेमकं काय हवं आहे, त्याला हे प्रॉडक्ट घेतल्यामुळे कसे वाटेल, प्रॉडक्ट वापरताना कसे वाटेल या सर्व संवेदनांचा विचार करणे आणि त्या दृष्टीने प्रॉडक्टचे डिजाईन करणे. हे प्रॉडक्ट वापरताना कस्टमर चा भर कोणत्या गोष्टींवर असेल, तो हे प्रॉडक्ट कशासाठी वापरेल वा वापरू शकेल याचा विचार करणेही अतिशय महत्वाचे आहे. यातून आपण काय मूल्यवृद्धी ऑफर करू शकतो याचा अंदाज येऊ शकतो. जे प्रॉडक्ट आपण डिजाईन करत आहोत याच्या वापराच्या परिणामांच्या दृष्टीने विचार करणेही महत्वाचे आहे. म्हणजे त्यामुळे कस्टमरच्या बाबतीत जे काही चांगले किंवा वाईट परिणाम होणार आहेत याचा खोलवर विचार करणेही महत्वाचे आहे. आणि यातील वाईट परिणाम आपण घालवू शकतो का किंवा कमी करु शकतो का याचा विचार करणे महत्वाचे आहे. प्रॉडक्टचा वापर हा सूचक असावा म्हणजे नक्की प्रॉडक्टचा वापर कसा करायचा आहे ते आपसूकच वापरकर्त्याला कळत जायला हवे. म्हणजे डिजाईन करताना याचाही विचार होणे आवश्यक आहे म्हणजे प्रॉडक्टचा वापर हा आनंददायक होऊ शकेल जे प्रॉडक्टच्या यशस्वीतेची शक्यता नक्कीच वाढवू शकेल.

वरील सर्व गोष्टी या प्रत्येक यशस्वी प्रॉडक्टच्या डिजाईन प्रोसेस मध्ये विचारात घेतल्या गेल्या असाव्यात आणि म्हणूनच ती प्रॉडक्ट्स यशस्वी झाली असावीत. डिझाईनचा हा सर्वंकष दृष्टीकोन देणाऱ्या स्टीव्ह जॉब्ज नावाच्या किमयागाराला सलाम.

मनीष

२४ फेब्रुवारी २०१८

सवारी – दोलनांची

हे जग परफेक्ट आहे. इतकं की म्हणे बिग बँगच्या वेळी गुरुत्व इतकं परफेक्ट होतं की त्यामुळे हे विश्व ना संकुचित पाऊन पुन्हा शून्य आकारमानाचं बनलं, ना अनियंत्रितरित्या प्रसारण पावत गेलं. ते अतिशय संतुलित प्रमाणात प्रसरण पावत गेलं आणि अजूनही प्रसरण पावत आहे. इथं प्रत्येक गोष्ट प्रमाणात आहे. कुठं काही जास्त झालं की निसर्ग काहीतरी तिथून काढून घेतो. कुठं काही कमी पडतंय वाटलं की काहीतरी तिथं एक्स्ट्रा टाकतो. म्हणजे एकुणात काय सगळं बॅलन्स ठेवत असतो.

आजच्याच दिवशी १९६९ साली वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी एक व्यक्ती कालवश झाली. या व्यक्तीला प्रचंड लोकप्रियता मिळाली परंतु त्याच बरोबर बराच काळ एकांतवासही मिळाला. या व्यक्तीला एकमेवाद्वितीय सौन्दर्य मिळाले पण त्याच्याबरोबर एक असाध्य रोगही मिळाला. साऱ्या जगाला हवीहवीशी वाटणारी ही व्यक्ती पण हिला हवाहवासा वाटणारा आयुष्याचा जोडीदार मिळाला नाही. एवढी दिगंत कीर्ती लाभुनही ही व्यक्ती व्यक्तिगत आयुष्यात असमाधानी राहिली. एक शापित सौन्दर्य लाभलेली ही व्यक्ती म्हणजे मधुबाला. पण हा निसर्ग बॅलन्स राखण्याच्या नादात लोकांना दुःख देऊन जातो ही बाबही किती क्लेशदायक आहे. कदाचित माझ्या कोणत्या तरी आनंदाच्या बदल्यात हा क्लेश मला मिळाला असेल.

एकूण काय खूप दुःख भोगलेल्या व्यक्तींनी कधी काळी खूप सुख भोगले असावे. खूप सुख भोगणाऱ्या व्यक्तीने कधी काळी अतीव दुःख सोसले असावे. हा सुख दुःखाच्या दोलनांचा आयाम (amplitude) जेवढा जास्ती तेवढी त्याला लागणारी क्षमता/ऊर्जाही(मानसिक आणि शारीरिक) जास्ती. हा आयाम जेवढा कमी तेवढी लागणारी ऊर्जा कमी. या दोलनांची वारंवारिता (frequency) जेवढी जास्ती तेवढी त्याला लागणारी क्षमता/ऊर्जा जास्ती आणि जेवढी ही वारंवारिता कमी तेवढी त्याला लागणगी क्षमता/ऊर्जा कमी. आणि जो शून्य रेषेवर राहतो त्याला सर्वात कमी ऊर्जा लागत असणार. पण मला असं वाटतं की लोकांना या शून्य रेषेवर राहण्यापेक्षा सुखदुःखाच्या दोलनांवर स्वार होण्यासच आवडत असेल. फक्त हे आयाम आणि वारंवारिता कोणाला मोठी मिळत असतील तर कोणाला लहान. म्हणूनच मी म्हणेन –

Tie the belt and enjoy the ride. If you are down, you are going up soon and if you are up, remind yourself that you will be down soon.

मनीष

२३ फेब्रुवारी २०१८

व्यवसाय पोकळी

जिथं पोकळी आहे ती शोधणे आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी काही करता येईल का ते शोधणे या प्रकारच्या व्यवस्थापनाला काय म्हणावे? बऱ्याचदा आपल्याला पोकळी दिसतच नाही आणि यदाकदाचित दिसली तर ती भरून काढता येईल किंवा काढायला पाहिजे याचा आपण विचार करत नाही. सुदैवाने तो विचार झाला तर ती पोकळी कशी भरून काढता येईल ते आपल्याला सुचत नाही. पण जर का ही पोकळी आपण भरली तर आपल्याहून हुशार कोणीच नाही.

आता तुम्हाला वाटेल की “अरे यार काय चाललंय याचं !”. पण आता वरची सर्व वाक्यं ती पोकळी म्हणजे मार्केट मधील कस्टमरसाठी असणारी एखादी कष्टदायी गोष्ट किंवा ज्याच्या असण्यामुळे कस्टमरला फायदा होऊ शकतो असा विचार करून पुन्हा वाचून बघितली तर मला काय म्हणायचे आहे ते नक्की लक्षात येईल.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्याच्या पूर्वी भारतातून इंग्लंडला कापूस जायचा आणि तिकडून तयार कापड भारतात येत असे. हा सगळा कापसाचा प्रवास कापडाची किंमत वाढवत असे. ही पोकळी एक चाणाक्ष भारतीय व्यापाऱ्याने ओळखली आणि मुंबईमध्ये आजच्याच दिवशी इ.स. १८५४ मध्ये “दि बॉम्बे स्पिनिंग मिल” ला सुरुवात झाली. या व्यापाऱ्याचे नाव होतं कोवसजी नानाभाई डावर. भारतातल्या कापसावर भारतात प्रक्रिया करून कापड तयार करण्याची ही पहिली पायरी होती. हा कारखाना म्हणजे भारतातील औद्योगिक क्रांतीमधील पहिला कारखाना. आणि डावरजी हे पहिले कारखानदार. पुढे १८७० पर्यंत १३ कारखाने, १८९५ पर्यंत ७०, तर १९१५ पर्यंत त्यांची संख्या ८३ पर्यंत पोचली. पुढे आंतरराष्ट्रीय मंदी मध्ये काही टिकल्या तर काही बुडाल्या परंतु त्या आधीच मुंबईने देशाच्या औद्योगिकरणाचे नेतृत्व आपल्या हाती घेतले होते.

तर चला आता आपणही कामाला लागू. कस्टमरकडील पोकळी समजून घेऊ. त्याच्याकडचे प्रॉब्लेम, त्याचा फायदा होऊ शकणाऱ्या गोष्टी म्हणजे एक मोठ्ठी पोकळी आहे. आणि ही पोकळी म्हणजे आपल्या व्यवसायासाठी सुसंधी आहे कारण जी भरून काढल्याने आपला तर फायदा होणार आहेच पण कस्टमरचाही भरभरून फायदा होणार हे नक्की.

मनीष

२२ फेब्रुवारी २०१८

प्रयोग

साधारण १९८७ चा सप्टेंबरचा महिना असावा. काही शास्त्रज्ञ मंडळी शनिवारची सकाळची शाळा (?) सुटल्यावर एक महत्वाचा प्रयोग (जो एक उत्क्रांती घडवणार होता) करण्याकरता घरी काहीही न सांगता शाळेतून परस्पर त्या वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगशाळेत गेली. जाताना जास्वंदीची विविध रंगी अनेक फुले घेऊन त्या प्रयोगशाळेत म्हणजे या शास्त्रज्ञांच्या एका मित्राच्या मळीत (नदीकाठाचे शेत) गेली. त्यांना माहिती मिळाली होती की या मळीत वांगी लावली आहेत आणि सध्या त्याला फुले आली आहेत. एव्हाना चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल की प्रयोग काय होता आणि हे महान (?) शास्त्रज्ञ कोण होते. तर प्रयोग होता की जास्वंदीचे पुंकेसर वांग्याच्या फुलावर पखरल्याने काही नवीन प्रजाती जन्माला येऊ शकते काय आणि हा प्रयोग करण्यासाठी उपाशीपोटी, घरी काही न सांगता, शाळेतून गेलेले बाल शास्त्रज्ञ म्हणजे मी, डॉ. गजानन कागलकर, इंजि. केदार कुलकर्णी, डॉ. योगेश शिरगुप्पे, इंजि. सुहास हलवाई. शाळेत त्या दिवशी मोहिते सरांनी शिकवलेल्या विज्ञानाच्या पुस्तकावरील धड्यावर केलेला हा स्वयंशोधीत प्रयोग झाला आणि त्यातून काय घडले की नाही यापेक्षा हा प्रयोग केला हे आमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची घटना होती. कारण हीच नवनिर्मितीच्या आमच्या प्रयत्नाकडे पहिले पाऊल होती. (आणि या प्रयोगावेळी मुले बेपत्ता आहेत म्हणून सर्व पालकांचा पोलीस ठाणे प्रयोग चालू होता हा प्रयोग अलाहिदा, आणि घरी नंतर झालेला कौतुकसोहळ्याचा प्रयोग तर भलताच गाजला)

आजच्याच दिवशी १९५३ साली जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रीक यांनी DNA च्या structure वरील पेपर प्रकाशित केला. यामध्ये DNA ची शिडी सारखी रचना तसेच यात असणाऱ्या A, G, C आणि T या प्रथिनांची साखळी याबद्दल याबद्दल केलेले संशोधन प्रकाशित केले होते. याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कारही मिळाला. माणसाला स्वतःबद्दलची जाणीव झाल्यापासून म्हणजे होमो सॅपीअन चा होमो सॅपीअन सॅपीअन झाल्यापासूनचा त्याच्या स्वतःच्या शोधातील हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणावा लागेल. या टप्प्यापासून त्याला स्वतःच्या जनुकांबद्दल तसेच त्या मधील उणिवांबद्दल, त्यांच्या संक्रमणाबद्दल माहिती व्हायला सुरुवात झाली. तसेच हे जनुकीय दोष अथवा उणीवा कशा भरून काढता येतील या बद्दलही विचार व्हायला, संशोधन व्हायला सुरुवात झाली. हा विचार फक्त स्वतःपुरता मर्यादित न राहता कृषी मधील बीज निर्मिती कडे पण वळला आणि कितीतरी अधिक उत्पादन देणाऱ्या तसेच विशिष्ट रोगांना अवरोध करणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करण्यात आल्या. औद्योगिक क्रांतीनंतर ही एक मोठीच क्रांती ठरली.

जिज्ञासा या एकमेव सद्गुणावर एवढी प्रगती केलेल्या मानव जातीला आज बाहेरील जग म्हणजे खगोलीय जग जेवढं खुणावतंय तेवढच त्याच्या आतलं जग खुणावतंय. त्याने जरी आपली शारीरिक रचना जाणून घेतली असली तरी त्याहून जटील आणि न सापडणारी मानसिक रचना त्याला अजून गवसायची आहे. ती जेंव्हा गवसेल तेंव्हाच खऱ्या अर्थाने तो जिंकला म्हणावे लागेल पण तेंव्हा हे जिंकणे हे विन-विन जिंकणे असेल यात शंका नाही.

मनिष

२१ फेब्रुवारी २०१८

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑